तोत्तोचान: मराठी पुस्तक पीडीऍफ़ वर्णन | Tottochan: Marathi Book PDF Description
तोमोई आणि तिची स्थापना करणारे सोसाकु कोबायाशी यांचेबद्दल लिहिण्याची फार वर्षापासूनची माझी इच्छा होती. यातला कुठलाही प्रसंग मी कल्पनेनं निर्माण केलेला नाही. हे सारं खरंखरं घडलंय आणि सुदैवानं मला ते अजून जसंच्या तसं लक्षातंय. ते लिहिण्याची तीव्र इच्छा मला होतीच. मात्र त्याबरोबर हे पुस्तक तयार होण्यासाठी दुसरं एक कारण आहे. माझी मोडलेली ‘प्रतिज्ञा किंवा ‘वचन’ यामुळं हे पुस्तक आज साकारतंय. मी मोठी झाल्यावर तोमोईमध्ये शिक्षिका होण्याचं वचन कोबायाशींना दिलं होतं. दुर्दैवानं ते वचन पूर्ण करण्याची संधी मला मिळालीच नाही, म्हणून लोकांना किमान तोमोई आणि कोबायाशींविषयी अधिकाअधिक सांगावं, त्यांचं मुलांबद्दलचं प्रेम जगाला माहिती करून द्यावं, तसंच मुलांना शिकविण्यासाठी त्यांनी कोणकोणते मार्ग अवलंबिले याची माहिती द्यावी, हा या लेखनामागचा माझा प्रामाणिक हेतू.
श्री. कोबायाशींनी 1963 साली या जगाचा निरोप घेतला. आज जर ते असते तर अजूनही कित्येक गोष्टी ते तोमोईबद्दल सांगू शकले असते. आजही मी जेव्हा माझ्या सुखी आणि आनंदी बालपणाकडे पाहाते तेव्हा जाणवतं, की ज्याला मी केवळ बालपणाची मौज समजत होते ते सारे उपक्रम कोबायाशींनी फार फार विचार करून, विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून आखलेले होते. ‘अरेच्चा, म्हणजे तेव्हा त्यांच्या मनात असं असणार’ हे आज वाटतंय. तेव्हा अर्थातच त्या कशाचीच मला जाणीव नव्हती. या प्रत्येक नव्या शोधाबरोबर माझी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता वाढत जाते.
माझ्या स्वत:च्या बाबतीत सांगायचं तर, त्यांच्या, ”तू फार चांगली मुलगी. आहेस!’* या एका वाक््यानं माझ्या सबंध आयुष्याला केवढा अर्थ प्राप्त करून दिलाय, हे शब्दात नाही सांगता येणार. मी तोमोईमध्ये गेले नसते किंवा मला कोबायाशी भेटले नसते तर कदाचित् शाळेतून काढून टाकलेली वाईट मुलगी असा कायमचा शिक्का माझ्यावर बसला असता आणि मनात कसले तरी न्यूनगंड घेऊन मी जगले असते….